काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर येवले अमृततुल्य चहा चांगलाच गाजला होता. येवले चहामध्ये हानिकारक पदार्थ आहेत असा खुलासा केला जात होता. मात्र FDA ने आता येवले चहाला ग्रीन सिग्नल दिला आहे. ‘येवले अमृततुल्य’चे संस्थापक संचालक नवनाथ येवले यावर स्पष्टीकरण देतांना म्हणाले की वैयक्तिक आकसापोटी काही समाज कंटकांनी ग्राहकांच्या नजरेत धूळ झोकण्यासाठी ‘येवले अमृततुल्य’ वर खोटे आरोप केले होते; परिणामी FDA ला कारवाई करावी लागली. या दरम्यान FDA ने येवले चहाचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याच बरोबर त्यांनी हेही सांगितले की FDA ने येवले अमृततुल्यला भेट दिल्या नंतर ‘चहा पॅकिंग वर लेबल नसणे’ इत्यादी सारख्या किरकोळ चुका त्यांना मिळाल्या आणि त्या ताबडतोब दुरुस्त करण्यात आल्या. मात्र काही लोकांनी येवले चहात हानिकारक पदार्थ आहे अशी अशी अफवा पसरवली.
एकीकडे FDA कडून येवले अमृततुल्य चहाची निर्दोष सुटका झाली तर दुसरीकडे चहात भांडे घासायच्या घासणीची तार मिळाल्याने खळबळ माजली आहे. अंबरनाथ पश्चिमेतील नगरपालिका कार्यालयासमोर असलेल्या येवले चहा विक्रेत्याच्या दुकानात विकास सोमेश्वर या ग्राहकाच्या चहाच्या कपात घासणीची तार आढळली आहे. लोकमतच्या रिपोर्ट नुसार ग्राहकाने तक्रार केली असता दुकानदाराने हुज्जत घातली, उद्धट उत्तरे दिली. त्यामुळे परिणामी ग्राहकाने आक्रमक पवित्रा घेतला आणि सर्व चहा फेकून दिवसभर दुकान बंद ठेवणं दुकानदाराला भाग पडलं. याबाबत अन्न व औषध पुरवठा विभागाकडे तक्रार करणार असल्याचेही सोमेश्वर यांनी सांगितले आहे.