‘कोरोना’शी मुकाबला करण्यासाठी राज्य शासन सज्ज झाले असून साथरोग नियंत्रण अधिनियम कायदा १८९७ लागू झाला आहे; राज्यात साथीच्या आजाराचा उद्रेक जरी झाला नसला तरी हा आजार रोखण्यासाठी या कायद्याच्या माध्यमातून अधिक प्रभावी उपाय योजण्यास मदत होणार आहे,दरम्यान सदर कायद्याचे उल्लंघन झाल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो..देशात करोनच्या रुणांची संख्या १०७ वर पोहोचली असून यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात(३५ रुग्ण) असून त्या पाठोपाठ केरळचा क्रमांक लागतो.
हा कायदा लागू झाल्यानंतर राज्यातील सर्व पर्यटन स्थळे तसेच धार्मिक ठिकाणे ओसाड पडली असून लोक घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा घाबरत आहेत. शनिवारी आणि रविवारी एरवी मुंबई पुणे महामार्गावर होणाऱ्या गर्दीला सुद्धा चाप लागला आहे. रायगड जिल्ह्यातील धार्मिक तीर्थक्षेत्र पाली, तालुका सुधागड बल्लाळेश्वर मंदिर, खालापूर तालुक्यातील महड वरदविनायक मंदिर, उरण तालुक्यातील घारापुरी लेणी तसेच खालापूर तालुक्यातील इमॅजिका वॉटर पार्क ३१ मार्च पर्यंत नागरिकांना प्रवेशासाठी बंद करण्यात आले आहेत. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात तर चक्क सॅनिटायसर्स चे वाटप करण्यात येत आहे.
जिल्हाअधिकाऱ्यांच्या आदेशावरून श्री.क्षेत्र जोतिबा डोंगर येथे सुद्धा जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेला आहे.त्यानुसार आज रविवार दि.१५ मार्च २०२० रोजी श्री.जोतिबा मंदिर पहाटे पाच पासून दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
प्रसिद्ध देवस्थान असलेले श्री तिरुपती बालाजी मंदिराला देखील कोरोनाचा फटका बसला असून बालाजी मंदिरातील दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरातून लाखो भाविक तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी दाखल होत असतात. कोरोना व्हायरसची भारतात झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता,मंदिर समितीने बालाजी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.