विधानसभा निवडणुकीचा निकाल शेवटच्या टप्प्यात आला असून काही मतदारसंघांतील निकाल जाहीर झाला आहे. परळी मतदारसंघातील धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांच्यातील राजकारण महाराष्ट्रात कायम चर्चेचा विषय असतो. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालामुळे या चर्चेला पुन्हा एकदा तोंड फुटले आहे.
परळी मतदारसंघांतील भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला असून त्यांच्या विरोधात उभे असलेले त्यांचे बंधू धनंजय मुंडे बहुमताने निवडून आले आहेत. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असून मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच ते आघाडीवर होते. गेल्या आठवड्यात या दोघांमध्ये वाद सुरू असल्याने त्याबद्दल राज्यभरात चर्चा चाललेली होती. त्यामुळे सत्ता नेमकी कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष होते. याचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. मतमोजणीच्या अंतिम फेरीत धनंजय मुंडे तब्बल २८,११६ मतांनी आघाडीवर होते. त्यामुळे पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव झाला. यावर पत्रकारांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “विजय हा विजय असतो आणि पराभव हा पराभव असतो, माझ्या पराभवाची पूर्ण जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेते.”