राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ८० वर्षांचे असूनही नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी दौरे करीत आहेत. तसेच राज्यभर कोरोनाचे सावंत असतांनाही ते दौऱ्यावर जात आहेत. त्यांची हीच काम करण्याची क्षमता पाहून प्रभावित झालेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांचे कौतुक केले. या ट्विटमध्ये त्या शरद पवारांना उद्देशून म्हणाल्या, “हॅट्स ऑफ, कोरोना च्या परिस्थितीत इतका दौरा , आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले … पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे.”
काल २७ ऑक्टोबरला महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगार व उसवाहतूक संघटनांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट मांजरी बुद्रुक येथे बैठक झाली. या बैठकीत ऊसतोड कामगारांची नोंदणी, साखर कारखाने तसेच ऊसतोड कामगारांसाठी नवीन योजना, वैयक्तिक अर्थसहाय्य योजना, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी वसतीगृहे, भोजन योजना, कामगार महिलांसाठी आरोग्य योजना, कामगारांसाठी विमा योजना, यांसह विविध बाबींवर सविस्तर चर्चा झाल्याचे पंकजा मुंडेंनी ट्विटद्वारे सांगितले. तसेच या बैठकीस शरद पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री धनंजय मुंडे, हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्यासह काही कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचेही पंकजा मुंडेंनी ट्विटमध्ये सांगितले.