कोरोनातून बऱ्या झालेल्या नर्सचं जंगी स्वागत करणं राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांना चांगलंच महागात पडलं आहे. त्यांच्याविरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मंगला कदम यांच्यासह आणखी 4 जणांवर निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अतिशय महत्त्वाचं बनलं आहे. तसंच शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं सक्तीचं आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचा भंग केलेला आहे तसंच अनावश्यक कारणांसाठी गर्दी जमवल्याचा आरोप करत निगडी पोलिसांनी कदम यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कोरोनातून बऱ्या झालेल्या नर्सचं घरी आगमन होत असताना मंगला कदम यांनी ढोल-ताशा लावत आणि पुष्पवृष्टी करत त्यांचं जंगी स्वागत केलं. यावेळी आजूबाजूला नागरिकांचा घोळका दिसत होता. यावेळी त्यांच्याकडून नियमांचं पालन न झाल्याने त्यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, कोरोनातून बऱ्या झालेली नर्स ह्या पुण्यातल्या ससून रूग्णालयात कार्यरत होत्या. सेवेत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतू उपचारानंतर त्यांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. संभाजीनगर परिसरात हे दाम्पत्य वास्तव्याला आहे. महिला नर्स आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नर्स काही दिवसांपासून रुग्णालयातच वास्तव्याला असताना या नर्सचे 15 एप्रिल रोजी कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यांनतर महिलेच्या पतीचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.दोघांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते.