सिंहगड रस्ता, कोथरूड, औंध भागातील कडक संचारबंदीतुन शिथिलता मिळताच दारूचे दुकाने उघडण्यापूर्वीच हजारो तळीरामांनी गर्दी केली, रस्त्यावर गाड्यांची गर्दी झाल्याचे चित्र सकाळपासून पाहायला मिळत आहे. यामुळे लाॅकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाल्याचेच स्पष्ट झाले आहे.
पुण्यामध्ये ८० टक्के भागात कडक लाॅकडाऊन आहे, मात्र, सिंहगड रोड, कोथरूड, वारजे, औंध, बालेवाडी या २० टक्के भागात शिथीलता आणली आहे. दारूचे दुकाने उघडणार असल्याने सकाळी साडे आठ नऊ वाजल्यापासून वाईन शाॅप समोर मद्य प्रेमींनी तुफान गर्दी केली होती. गर्दी होणार याचा अंदाज आल्याने दुकानदारांनी सुरक्षा रक्षक नेमले होते, या तळीरामांना रांगेत उभा करणे, सोशल डिस्टंन्स ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले.
या दुकानासमोर २००-३०० जणांची रांग असल्याने अनेक वाईन शाॅप मालकांची गर्दी कमी होणाची वाट पाहात दुकान उघडले नाही. मात्र दुकानासमोरील रांग कमी होण्याऐवजी वाढतच गेली. तसेच देशी दारूच्या दुकानासमोर सुद्धा ही अशीच गर्दी होती.
गेले काही दिवस किराणा दुकान, चिकन-मटणाच्या दुकानासमोर सोशल डिस्टंन्स ठेवून रांगा लागत होत्या, मात्र आज दारूच्या दुकानासमोरच शेकडो लोक उभे असल्याने हा चर्चेता विषय ठरला. या गर्दी व रांगांचे फोटो, व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले. त्यावेळी दारू एवढी अत्यावश्यक वस्तू आहे का अशीच चर्चा रंगली.
दरम्यान, शहरात काहा पेट्रोल पंपावरही नागरिकांना रांगा , तेथेही सोशल डिस्टंन्सींगच्या नियमांचे पालन झाले नाही. सिंहगड रस्ता भागात पोलिसांनी जबरदस्तीने दुकाने बंद करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला.
नागरिक रस्त्यावर आलेले असताना त्यांच्यामध्ये महापालिकेने जाहीर केलेल्या नियमांबद्दल सुद्धा गोंधळ होता.