कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात २४ मार्चपासून लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. हा लॉकडाऊन वाढत जाऊन ३१ जुलैपर्यंत पाळण्याचे आदेश आहेत. ४ महिने उलटून गेले तरीही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतांनाच दिसत आहे. त्यामुळे १ ऑगस्ट नंतर सरकार पुन्हा लॉकडाऊन घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लॉकडाऊन मुळे संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला आर्थिक मंदीची झळ सोसावी लागणार आहे. भारतातील अनेक तरुणांच्या नोकऱ्या, व्यापाऱ्यांचे व्यापार तसेच मजुरांची कामे धोक्यात आली आहेत. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लॉकडाऊन वाढवल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला आहे.
“लॉकडाऊन मुळे आधीच जे नुकसान झालंय ते भरून काढायला जनतेला नाकीनऊ येणार आहेत. त्यातच आणखी लॉकडाऊन वाढवले तर जनतेचा संयम सुटेल व जनता रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. वंचित बहुजन आघाडी देखील या आंदोलनात जनतेसोबत असेल” असे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी सरकारला उद्देशून केले. अकोला येथे भरलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी तेथे प्रदेश प्रवक्ते डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, प्रमोद देंडवे तसेच वंचित बहुजन आघाडीचे इतर काही पदाधिकारी उपस्थित होते.