आज १ ऑगस्ट २०२० ला देशभरात बकरी ईद साजरी करण्यात आली. सहसा या दिवशी बकऱ्याचा बळी दिला जातो. परंतु पुण्यातील काही मुस्लिम बांधवांनी हा दिवस बकऱ्याचा बळी न देता रक्तदान करून साजरा केला. MPC न्यूजच्या वृत्तानुसार पुण्यातील साने गुरुजी स्मारक येथे हे रक्तदान शिबिर पार पडले.
या समूहाने बकरी ईद साजरा करण्याची पारंपरिक पद्धत डावलून संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला आहे. तसेच या कृतीमुळे त्यांचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. सद्यस्थितीत कोरोनाच्या प्रादुर्भावाने रुग्णालयांना रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही बाब लक्षात घेऊन पुण्यातील मुस्लिम सत्यशोधन मंडळाने बकरी ईदच्या निमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.