Home महाराष्ट्र पुणे पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या,८ दिवसांपासून होते बेपत्ता, मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार.

पुण्यात माहिती अधिकार कार्यकर्त्याची हत्या,८ दिवसांपासून होते बेपत्ता, मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार.

0

प्राईम नेटवर्क : शिवणे येथील माहिती अधिकार कार्यकर्ते विनायक शिरसाठ यांचा मृतदेह पिरंगुट ते लवासा रोडवर सापडला असून ते मागील ८ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांचा खून करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात येत आहे. विनायक शिरसाट यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, याची माहिती दिल्यानंतरही पोलीस १० दिवस हातावर हात धरुन बसले. त्यामुळे या हत्येमागे हात असलेल्यांना अटक केल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा शिरसाट यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे.

याबाबत विनायक शिरसाट याचे वडील सुधाकर ऊर्फ अण्णा शिरसाट यांनी सांगितले की, ३० जानेवारीला विनायक सकाळी आमच्या जांभुळवाडी येथील कामावर वायरची बंडले घेऊन गेला होता. दुपारी अडीच वाजता त्याच्याशी फोनवर बोलणे झाले़ होते. त्याने उत्तमनर, शिवणे, न-हे येथील बेकायदा बांधकामाविषयी पीएमआरडीएकडे तक्रारी केल्या होत्या. त्यापैकी काहींचे बांधकाम पाडण्यात आले होते. त्यामुळे ४ गावातील लोक त्याला धमक्या देत होते. बिल्डर लॉबीनेच सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप अण्णा शिरसाट यांनी केला आहे.

३० जानेवारीला आम्ही भारती विद्यापीठ पोलिसांकडे गेलो. त्यांनी अपहरणाची तक्रार घेण्याऐवजी केवळ हरवल्याची तक्रार घेतली. अपहरण झाल्याचे लक्षात येत असतानाही ५ दिवस त्यांनी टोलवाटोलवी केली. त्यानंतर ५ फेब्रुवारीला अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्याला कोण कोण बिल्डर धमक्या देत होते़ याची माहिती पोलिसांना देऊनही त्यांनी गेल्या १० दिवसात काहीही कारवाई केली नाही. कारवाई करावी, म्हणून आम्ही पोलीस उपायुक्त व पोलीस आयुक्त यांना दोनदा भेटलो. तरीही कोणीही कारवाई केली नाही़. त्यामुळे आता गुन्हेगारांना अटक केल्याशिवाय आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही, असे अण्णा शिरसाट यांनी सांगितले़

वरीष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक शिरसाठ हे ५ फेब्रुवारी पासून बेपत्ता होते. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे त्यांचे अपहरण करण्यात आल्याची तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा नोंदवल्यानंतर तपासाला सुरुवात केली. शिरसाठ यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता शेवटचे लोकेशन हे पिरंगुट लवासा रोडवरील मुठा गावच्या हद्दीत आढळले. त्यानुसार पोलीस मागील २ दिवसांपासून मुठा गावच्या हद्दीत त्यांचा शोध घेत होते. अखेर सोमवारी मुठा गाव पासून काही अंतरावर असलेल्या खोल दरीत कुजलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला.याप्रकरणी अधिक तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.