Home महाराष्ट्र पुणे अख्खं जग लॉकडाऊन पण पुण्यात रंगलाय खुणांचा डाव!

अख्खं जग लॉकडाऊन पण पुण्यात रंगलाय खुणांचा डाव!

0

कोरोना विषाणूचा जगभर तांडव सुरू असताना पुण्यात पुर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर बाहेर आलेल्या कैद्याचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. मागील दोन ते तीन दिवसातील येरवडा परिसरातील ही खूनाची दुसरी घटना आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नितीन शिवाजी कसबे (वय 24,रा. भिमज्योत मित्रमंडळ जवळ येरवडा) असे खून झालेल्याचे नाव आहे.

ही घटना बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास शादलबाबा चाैक रोडवर रेड्डी हाॅटेलच्या समोर येरवडा येथे घडली. याप्रकरणी, नागेश राजू कांबळे (वय 25, रा. वैदवाडी हडपसर) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिस ठाण्यात 16 जणांच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून, पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

दरम्यान परवादिवशी किरकोळ भांडणातून एका केटरींग व्यावसायिक तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून सोमवारी रात्री आठच्या सुमारास खून करण्यात आला. प्रतिक हनुमंत वन्नाळे (वय २८) (रा. स नं २७, पंचशील नगर, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

तसेच मंगळवारी आईला कामावर सोडून घरी परत जात असताना एका युवकाला अज्ञात इसमांनी आडवून त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला. हि घटना मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी गावातील गंगानगरमधील स्मशानभूमी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीं विरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बसवराज कांबळे (वय २७, रा.आष्टविनायक कॉलनी, फुरसुंगी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

एकीकडे लोक कोरोनामुळे स्मशान शांततेत घरी लॉक डाऊन असताना पुण्यात मात्र झोप उडवणारे खुनाचे प्रकार रोज ऐकायला मिळत आहेत, पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील कारवाई सुरू आहे.