बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत सध्या बरीच चर्चेत आली आहे. सुशांत सिंग राजपुतच्या आत्महत्या प्रकरणावरून कंगणा मुंबई पोलिसांवर टीकास्त्र सोडत आहे. मुंबई पोलिसांबद्दल कंगणाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अनेक राजकीय नेत्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. यात शिवसेना नेते तिच्या विरोधात बोलत आहेत तर भाजप नेते तिला पाठिंबा देत आहेत. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगणाला संरक्षण देऊ असे सांगणारे केलेले एक ट्विट चर्चेत आले आहे.
‘मुंबईची स्थिती पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे झाली आहे’ असे वक्तव्य कंगणाने केल्यामुळे बऱ्याच नेत्यांनी तसेच मुंबईकरांनी तिला विरोध दर्शवला व धमक्याही दिल्या. त्यावर आणखी भडकून आज ४ सप्टेंबरला कंगणा आपल्या ट्विटमध्ये म्हणाली की, ‘काही लोक मला मुंबईत येऊ नको म्हणून धमकावत आहेत. म्हणून मी ठरवलं आहे की येत्या ९ सप्टेंबरला मी मुंबईला येत आहे. मी एअरपोर्ट ला पोहचल्यावर कळवेल. तरी कोणाच्या बापाची हिंमत असेल तर मला थांबवून दाखवा.’ अशा तिखट शब्दांत आज तिने टीकाकारांना व धमक्या देणाऱ्यांना सुनावले.
यावरून शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कंगणाला प्रत्युत्तर दिले आणि म्हणाले की, ” मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे.” तसेच ‘शिवसेना अशा महाराष्ट्र दुश्मनांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही’ अशा शब्दांत अप्रत्यक्षपणे त्यांनी कंगणाला धमकावले.
यावर रिपाई पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कंगणाला पाठींबा देत तिला RPI संरक्षण देईल असे म्हटले. याशिवाय ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “अभिनेत्री कंगणा राणावतला तिचे मत मांडण्याचा व मुंबईत राहण्याचा अधिकार आहे.”