Home महाराष्ट्र पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिने निर्बंध

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर सहा महिने निर्बंध

0

पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आजपासून सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले असल्याची बातमी समोर आली आहे. याशिवाय बँकेचे सर्व व्यवहार बंद केले गेले आहेत. या घटनेमुळे पीएमसीच्या खातेदारांची गैरसोय होत आहे. बँकेतून केवळ एक हजार रुपये काढता येणार असल्याने पीएमसीच्या शाखांवर खातेदारांची गर्दी झाली आहे. गर्दी आटोक्यात आणण्यासाठी बऱ्याच ठिकाणी पोलीस बंदोबस्त केला आहे. काही ठिकाणी संतापलेल्या खातेदारांनी बँकेवर दगडफेक केल्याचे देखील समोर येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून पीएमसी बँकेच्या व्यवहारांत अनियमितता आढळून आल्याने बँकिंग रेग्युलेशन ऍक्टमधील ३५ अ या नियमांतर्गत ऑनलाईन तसेच ऑफलाईन सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँकेकडून बंद करण्यात आले आहेत. निर्बंध लागू असला तरी या कालावधीत कर्मचाऱ्यांचे खर्च, बँकेच्या जागांचे भाडे अशा कामांसाठीचा खर्च एका ठराविक मर्यादेपर्यंत बँकांमधून चालू ठेवता येईल असेही सांगण्यात आले.

या घटनेचे स्पष्टीकरण देतांना पीएमसीचे संचालक जॉय थॉमस यांनी पीएमसीच्या खातेदारांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल माफी मागून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. तसेच पुढील सहा महिन्यांत सर्व अडचणी सोडवल्या जातील असा विश्वासही दिला आहे.