नागपूरमधील एका औषध निर्मिती कंपनीच्या विक्री अधिकाऱ्याला काही लुटारूंनी भर रस्त्यात गाठून लुबाडल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी घडला. लुटारूंनी या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून तब्बल दीड लाख रुपयांनी लुबाडले. हा ४५ वर्षीय अधिकारी कोराडी येथील रहिवासी असून एमआयडीसी पोलिसांकडे याबद्दलची तक्रार त्याने दाखल केली आहे.
पोलिसांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, हा अधिकारी शुक्रवारी कारने एमआयडीसी मध्ये जात असतांना तीन तरुणांनी त्याला रायसोनी कॉलेजजवळ थांबवले व तिघेही कारमध्ये शिरले. अधिकाऱ्याला चाकूचा धाक दाखवत ते त्याला थोडे पुढे घेऊन गेले व ८ लाखांची मागणी केली. अधिकाऱ्याने नकार दिल्याने गाडीतच त्या तरुणांनी त्याला मारहाण केली व पाकिटातून ३००० रुपये आणि एटीएम कार्ड काढून घेतले. कार्डद्वारे एटीएम मधूनही त्यांनी ९०,००० रुपये काढले. तसेच अधिकाऱ्याला मित्रकडूनही ५०,००० रुपये मागून घेण्यास लुटारूंनी भाग पाडले. हे पैसे घेण्यासाठी लुटारूंनी त्यांच्यातच सामील असलेल्या एका तरुणीला पाठवले. पैसे मिळाल्यानंतर लुटारू अधिकाऱ्याला गाडीतच सोडून तेथून पसार झाले. दुसऱ्या दिवशी त्या अधिकाऱ्याने एमआयडीसी पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवली. तेथील वरीष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत खराबे यांनी हे प्रकरण हाती घेतले असून एका लुटारूला पकडण्यात त्यांना यश आले आहे. तसेच पोलीस इतर लुटारूंच्या शोधात आहेत.