Home महाराष्ट्र कोल्हापूर सांगली कोल्हापुरात यंदाही पुराचे संकट ओढवणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगली कोल्हापुरात यंदाही पुराचे संकट ओढवणार; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

0

गेल्या वर्षी सांगली, सातारा, कोल्हापूर या भागात अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली होती व कित्येक लोकांचे नुकसानही झाले होते. यावर्षीदेखील त्या भागात अतिवृष्टी होत असून पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू आहे. काल अर्थात रविवारी दिवसभर तसेच रात्रभर देखील पाऊस सुरूच होता.

त्यामुळे या भागांतील वारणा, राधानगरी, कोयना या मोठमोठ्या धरणांमध्ये पाण्याचा विसर्ग वाढला असून त्यांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. सांगली येथील कृष्णा नदीची पाण्याची पातळी ३२ फुटांपर्यंत गेली असल्याने नदीकाठावरील बऱ्याच भागात पुराचे पाणी साचले आहे. तसेच सांगलीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने तेथील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. याशिवाय वारणा नदीची पातळी देखील वाढत असल्याने वारणेच्या काठाला लागून असलेल्या १०० अधिक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच रस्त्यांवरही नद्यांचे पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. पुरग्रस्तांच्या स्थलांतरासाठी एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच प्रशासनाने नदीकाठावर वस्ती असलेल्यांना लवकरात लवकर सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे आवाहन केले आहे. ही सर्व परिस्थिती पाहता गेल्या वर्षीप्रमाणे महापूराचा धोका निर्माण झाला आहे.