भाजपाचे नवीन आमदार गोपीचंद पडळकर धनगर समाजाच्या आरक्षण मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत, या बाबत भूमिका मांडताना ते म्हणाले, ” शरद पवार हे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत असे माझे ठाम मत आहे. त्यांनी अनेक वर्षांपासून नेतृत्व केलं पण त्यांनी सदैव बहुजनांवर अन्याय केला आहे”, या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून पडळकर माफी मागा अशी मागणी होत आहे.
पडळकर म्हणतात, ” शरद पवारांकडे कुठलाच अजेंडा नसतो, ते दोन गटात भांडणे लावून देतात आणि एका गटाला आपल्याकडे ओढून त्यांच्यावर अन्याय करत राहतात. धनगर समाजाच्या बाबतीत ते कुठलेही ठोस पाऊले उचलणार नाहीत हे सत्य आहे”
पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली. मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणतात, “ज्यांना कुणाला महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचं असतं त्यांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं की झालं अशी नवी प्रथाच सुरू झाली आहे. प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी हे लोक असले प्रयत्न करत राहतात. पडळकर यांनी नरेंद्र मोदी यांचा कित्येक वेळा अपमान केला तरीसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना डोक्यावर उचलून धरले आहे”
फडणवीसांनी सदर प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे, “मी पडळकरांना या आधी सुद्धा सांगितले होते की शरद पवार हे जरी राजकीय विरोधक असले तरी ते आपले शत्रू नाहीत. पवार साहेबच काय तर कुठल्याही मोठ्या नेत्यावर अशा प्रकारची विधाने करणे सपशेल चुकीचं आहे.
महाराष्ट्रातील धनगर समाज हा अनुसूचित जमातींमध्ये समावेशासाठी अनेक दिवसांपासून मागणी करतो आहे, सद्यस्तिथीला त्यांचं आरक्षण हे विमुक्त जाती मध्ये मोडले आहे, २०१४ मध्ये भाजप सरकारने धनगरांना अनुसूचित जमातींमध्ये समावेश करण्याचे आश्वासन दिले होते त्यांनतर हे आंदोलन तीव्र होत गेला.