राज्याच्या राजकीय उलाढालीनंतर शेवटी जेव्हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाविकास आघाडीचे नेते म्हणून व मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार पदी निवड झाली तेव्हा वरिष्ठ नेते मंडळींनी आणि शरद पवारांनी त्यांचे अभिनंदन केले. २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.४० वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांचा शपथविधी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवर्जून उल्लेख केला.
पवार म्हणाले, “हा सोहळा पाहण्यासाठी आज बाळासाहेब असते तर त्यांना खूप आनंद झाला असता.” उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर यांच्या नेतृत्वाखाली सर्व महाविकास आघाडीचे सरकार राज्यात चांगले काम करील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
पुढे पवार म्हणाले, “बाळासाहेबांनी अनेक लहान मोठ्या कार्यकर्त्यांना घडवले. चंद्रकांत खैरे यांचा जन्म ज्या समाजात झाला त्या समाजाची लोकसंख्या अवघी केवळ दोन ते तीन हजार असावी. मात्र बाळासाहेबांनी हा विचार कधीच केला नाही. चंद्रकांत खैरे यांना त्यांनी विधानसभेपासून लोकसभेवर पाठवले व कधी भेदभाव केला नाही. त्यांनी असे अनेक खैरे घडवले आणि अशी किमया फक्त तेच करु शकत होते.” अशी आठवण शरद पवारांनी सांगितली.