Home महाराष्ट्र महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, अरबी समुद्रातील स्मारक अजून कागदावरच!

महाराजांचा राज्याभिषेक सोहळा, अरबी समुद्रातील स्मारक अजून कागदावरच!

0

छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ ला राज्याभिषेक झाला होता. शिवप्रेमी हा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात.गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचं जागतिक स्तराचं सागरी स्मारक व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी तसंच शिवसेना – भाजप यांची सरकारं आली आणि गेली मात्र, या स्मारकाचा अजून साधा पायाही उभारला गेलेला नाही.

मुंबईच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याच्या प्रक्रियेला २०१८ मध्ये सुरुवात झाली. ऑक्टोबर २०१७ मध्ये याची सुद्धा निविदा मंजूर करण्यात आली.

मुंबईनजीक अरबी समुद्रामध्ये असणाऱ्या खडकावर स्मारक उभारण्याचे ठरले. हे शिवस्मारक मुंबईतील गिरगाव चौपाटीपासून 3.5 किलोमीटर, राजभवनापासून 1.5 किलोमीटर तर नरिमन पॉईंटपासून 5.1 किलोमीटर अंतरावर उभारण्यात येणार आहे.

11 जानेवारी 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शिवस्मारकाचे काम थांबवण्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अडीच वर्षांपूर्वी प्रत्यक्ष जागेवर खोदकाम केलं होतं. शिवस्मारकाच्या नियोजित जागेवरील खडकाच्या अभ्यासासाठी हे काम करण्यात आलं होतं. त्यानंतर कोणतंही मोठं काम इथं झालेलं नाही.

याविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले कज “सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाच्या कामामध्ये प्रगती होऊ शकलेली नाही. पण न्यायप्रविष्ट बाबींवर निर्णय आल्यानंतर शिवस्मारकाच्या कामाला गती देण्यात येईल.”

पण महाविकास आघाडी शिवस्मारकासाठी वेगाने काम करत नसल्याची टीका भाजपने केलीय.

“ज्या प्राधान्याने शिवस्मारकासाठी पाठपुरावा व्हायला हवा होता तो आताच्या सरकारकडून केला जात नाही. मराठा आरक्षणाचा निर्णयही न्यायालयात गेला होता. पण आम्ही ती प्रक्रियाही पूर्ण केली. पण महाविकास आघाडीकडून शिवस्मारकाचा विषय गांभीर्याने हाताळला जात नाही,” असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी केला.