Home महाराष्ट्र “सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत”: निलेश...

“सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत”: निलेश राणे

0

दिल्लीत जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथे अनेकांनी आंदोलन करीत पाय रोवले आहेत. दरम्यान एका तरुणीने मात्र JNU ऐवजी ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर हातात धरले होते. या मुलीचा फोटो पुढे बराच व्हायरल झाला आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. हा पोस्टर पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीकेची तोफ डागली. या व्हिडिओत फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना काही प्रश्नांची उत्तरे मागितली होती. ज्यात “हे आंदोलन नक्की कशासाठी? यात काश्मीर मुक्तीची घोषणा का? तुमच्या नाकाखाली टिच्चून मुक्त काश्मीरचा भारतविरोधी राग आवळला जातोय तो खपवून घेणार का?” असे सवाल फडणवीसांनी केले होते.

या सर्व प्रकारावर शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं की, ” या फ्री काश्मीरचा अर्थ आहे ‘काश्मीरची निर्बंधामधून मुक्तता करा’. त्याचबरोबर ‘काश्मीरमधील इंटरनेट व मोबाईल सेवा बंदच्या निर्बंधामधून मुक्तता करा’ अशी आंदोलक तरुणीने पोस्टरद्वारे मागणी करत आहे.” सोबतच मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा “असं पोस्टर हातात घेऊन आंदोलन करणाऱ्या मुलीचा उद्देश नक्की काय होता हे समजावून घ्यायला हवं” असं मत व्यक्त केले होते. मात्र संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या याच उत्तरावर निलेश राणी यांनी सणसणीत टीका केली. त्यांनी केलेली टीका पुढील प्रमाणे…

निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून ही टीका केली ज्यात संजय राऊत व आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी एकेरी भाषेत नावांचा उल्लेख करत संजय राऊत यांना ‘संज्या’ व आदित्य ठाकरे यांना ‘बारक्या’ म्हटलं आहे. ते म्हणाले, “Free Kashmir चा अर्थ शिवसेनेच्या संजय राऊत आणि बारक्या आदित्यला ‘Free Internet’ वाटला. लोकांना मूर्ख समजता???” असं म्हणत राणे यांनी “सरळ सांगून टाका सध्या आम्ही काँग्रेसवाल्यांची आणि पवारांची भांडी घासत आहोत म्हणून फ्री काश्मीरचा अर्थ आम्हाला विचारू नका.” अशी टीका केली.