नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी मुले राष्ट्रवादीच्या आजी-माजी नेत्यांमध्ये शब्दनाट्य रंगलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. “बाप बदलणारी औलाद नाही”,असं म्हणत आव्हाड यांनी नाईक यांच्यावर जहरी टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. पक्षांतर करणाऱ्या शरद पवारांची गणनादेखील बाप बदलणाऱ्या औलाद आहेत का असा सवाल नाईक यांनी आव्हाड यांना विचारला आहे.
“मी पक्ष बदलण्याच्या बाबतीत जितेंद्र आव्हाडांनी एक वक्तव्य केलंय की पक्ष बदलणाऱ्यांची औलाद आमची नाही! म्हणजे त्यांनी म्हटलंय की बाप बदलणारी औलाद मी नाही. पण कोणी पक्ष एकाएकी बदलत नाही. समाजकारणाला आणि राजकारणाला गती यावी किंवा स्वाभिमान जतन करता यावा, यासाठी माणूस पक्षांतर करतो”,असं नाईक म्हणाले. यानंतर पुढे बोलताना त्यांनी शरद पवार यांनी केलेल्या पक्षांतराचा उल्लेख केला.
माननीय शरद पवार साहेब पूर्वी काँग्रेसमध्ये होते,नंतर समाजकारण, राजकारण गतीमान व्हावं यासाठी त्यांनी एस काँग्रेसची स्थापना केली. त्यांनी पुलोद सरकारचं नेतृत्व केलं आणि कालांतरानं औरंगाबाद मुक्कामी असताना राजीव गांधींच्या उपस्थितीत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परत पुढे १९९९ साली स्वाभिमानाच्या मुद्द्यावर त्यांनी पक्ष सोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, असं म्हणत नाईक यांनी पवारांच्या पक्षांतराचा उल्लेख केला.