लॉकडाऊनच्या काळात राज्यभरातील मॉल्स, मंदिरे, शाळा, कॉलेजेस वगैरे बंद करण्यात आले होते. अनलॉकची प्रक्रिया चालू झाल्यानंतर सरकारने हळूहळू एकेका गोष्टीला उघडण्यासाठी परवानगी दिली. त्यानुसार राज्यभरातील मॉल्स व शॉपिंग कॉम्प्लेक्स चालू झाले आहेत. परंतु राज्यातील मंदिरे अजूनही बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील पुरोहित संघाचे काही अधिकारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे गेले होते. त्र्यंबकेश्वर ज्योर्तीलिंग मंदिर आवश्यक ती काळजी घेऊन भक्तांसाठी उघडण्यात यावे अशा आशयाचे निवेदनपत्र सरकारला देण्याची मागणी त्यांनी राज ठाकरेंकडे केली.
‘राज्य व केंद्र सरकारच्या सर्व नियमांचे पालन करून मंदिरे खुली करण्याची परवानगी राज्य सरकारने द्यावी असे मत राज ठाकरेंनी मांडले. तसेच ज्याप्रमाणे सर्व काळजी घेऊन मॉल्स उघडले त्याप्रमाणे मंदिरे का उघडू शकत नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल असे आश्वासन राज ठाकरेंनी पुजाऱ्यांना दिले.