प्राईम नेटवर्क : शिरूर लोकसभेतील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव हि पश्चिम महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी घटना मानली जाते आहे. कारण गेली तब्बल १५ वर्ष शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर मध्ये घट्ट पाय रोवून उभे होते, आणि त्यांना आवाहन देणं हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांना पोटात गोळा आणणार होतं. बारामती लोकसभा मतदार संघ शरद पवार यांनी मुलीच्या प्रेमा खातर सुप्रिया सुळे यांना दिल्या नंतर शरद पवार यांनी कुठून निवडणूक लढवावी असा मोठा प्रश्न राष्ट्रवादी पुढे पडला होता, शिरूर लोकसभा हि शरद पवारांची कर्म भूमी होती, तसंच बारामती पासून शिरूर जवळचा मतदार संघ असल्याने राष्ट्रवादीतील अनेकांनी शिरूर मधून पवारांनी उभं राहवं, असा सल्ला दिला, मात्र हा सल्ला न जुमानता पवार साहेबांनी शिरूर लोकसभा मतदार संघात सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला, आणि या खासगी सर्व्हे मध्ये पवारांना विरोधी कौल मिळाला, तेव्हा पासून पवारांनी येथून निवडणूक लढवण्यास नकार दिला. पण त्यामुळे शिरूर मधून राष्ट्रवादी साठी तगडा उमेदवार मिळत नव्हता, पर्यायाने आढळराव लाखांच्या घसघशीत मताने निवडून येत होते.
मात्र यावेळी आढळरावांचे एके काळचे सहकारी डॉ. अमोल कोल्हेंचं नाव पुढे करून अजित पवारांनी शिरूर मध्ये कुरघोडी केली आणि ती यशस्वी हि झाली. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरलेले अभिनेते आणि नेते डॉ. अमोल कोल्हे हे थेट खासदार म्हणून शिरूर मधून निवडणून आले. तसंच गेली १५ वर्ष खासदार राहिल्या नंतर, आणि मोदी लाट असुनी आढळराव पाटील का हरले यावर एक नजर टाकुयात…
आढळराव पाटलांचा अति आत्मविश्वास नडला
१५ वर्ष खासदार रोहिल्या नंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांना अति आत्मविश्वास नडला. शिरूर लोकसभेतील मतदार संख्या तब्ब्ल १८ लाखांच्या पुढे आहे. अमोल कोल्हेंना ६ लाख ३५ हजार ८३० मते तर, आढळराव पाटील यांना ५ लाख ७७ हजार ३४७ मते पडली, आणि इतर उमेदवारांना जवळपास ६० हजार मते पडली. अमोल कोल्हे आणि आढळराव पाटील या दोघां मधील मतांचा फरक ५८ हजार ४८३ इतका आहे. तब्ब्ल १८ लाख मतदारा पैकी फक्त १३ लाखाच्या आसपास मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवलाय, म्हणजे तब्ब्ल ५ लाख मतदार मत न देता घरीच बसले. यातील फक्त १० टक्के म्हणजे ५८ हजार मतदान आढळराव पाटील आपल्या अनुभवाच्या जोरावर नक्कीच मिळवू शकले असते, पण अति आत्मविश्वास नडला, आणि प्रचारात मागे पडले.
नेत्या पेक्षा अभिनेता मोठा ठरला
अमोल कोल्हे, आधी मनसे मग शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत जरी परतले होते, तरी भाषणां व्यतिरिक्त ते फारसे राजकारणात रमले नव्हते, त्यांनी जास्तीत जास्त वेळ, नाटक मालिका आणि सिनेमां साठीच दिला होता, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नंतर सर्वसामान्यांच्या मनात संभाजी महाराजां विषयी विशेष कुतूहल होतं, नव्या पिढीतील अनेकांना संभाजी महाराजांचा इतिहास आत्ताशी समोर आला असेल, संभाजी महाराजांच्या पात्राची खरी ओळख नव्या पिढीत अमोल कोल्हेंनीच करून दिली. त्यामुळे अनेकांसाठी अमोल कोल्हे हिरो ठरले. त्यांच्या भाषणातील अनेक लकबी, आवाजातील चढ उतार हे महाराजां प्रमाणेच असल्याचं जाणवतं, त्यामुळे त्यांच्या भाषणाचा प्रभाव अनेकांवर विशेषतः तरुण पिढीवर झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मालिका सुरु असल्याने अमोल कोल्हेंच्या पथ्यावर पडलं, आणि अमोल कोल्हेंच्या विजयात अप्रत्यक्षपणे हातभार लावला.
अमोल कोल्हेंसाठी दिलीप वळसे पाटील आणि समर्थकांची मेहनत
राज्यात महत्वाची पदे सांभाळणारे, माजी कॅबिनेट मंत्री दिलीपराव वळसे पाटील आणि समर्थकांनी अमोल कोल्हेंच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली, कारण शिवाजीराव आढळराव पाटील आणि वळसे पाटील हे एकमेकांना मदत करत असल्याचा आरोप अनेकदा पक्षातील आणि बाहेरील विरोधक करत होते. परंतु आढळराव पाटलांना तोडीस तोड उमेदवार मिळत नसल्याने ते सुद्धा हतबल झाले होते, परंतु यावेळी राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळाल्याने दिलीप वळसे पाटील आणि समर्थकांना बळ मिळालं होतं, त्यासोबत आपल्या वरील डाग पुसण्याची संधी वळसे पाटलांना मिळाली होती. त्यामुळे हि लढाई पाटील विरुद्ध पाटील अशीच रंगली होती, वळसे पाटलांचा प्रभाव आणि त्यांना मानणारे अनेक कार्यकर्ते खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर मध्ये त्यांचे अनेक खंदे समर्थक आहेत. त्यामुळे दिलीप वळसे पाटलांची अपार मेहनत दृष्टी आड करता येणार नाही.
भाजप आणि शिवसेनेतील मतभेद
खेड, जुन्नर, शिरूर, आंबेगाव मध्ये आढळराव पाटील आणि दिलीप वळसे पाटलांची ताकद जवळपास समान आहे. परंतु भोसरी, हडपसर मध्ये शिवसेना भाजपचं वर्चस्व होतं, या आधी स्थानिक नेत्यां सोबत झालेला मतभेद आणि शाब्दिक हल्ल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते नाराज होते, खासदारांच्या प्रचाराला प्रत्यक्ष आमदार जरी उपस्थित असले तरी, स्थानिक नगरसेवकांनी प्रचाराला हात आखडता घेतल्याचं चित्र दिसलं. भोसरी मध्ये सध्या सर्वाधिक भाजपचे नगरसेवक निवडून आले आहेत.
अमोल कोल्हेंचं प्रचारातील सातत्य
अमोल कोल्हे हे अभिनेते तर होतेच पण संभाजी महाराजांची मालिका आणि त्यातील व्यक्ती रेखा साकारत असताना निवडणूक सुरु झाली, हे अमोल कोल्हेंच्या पथ्यावर पडलं. अमोल कोल्हेंचा प्राचार फारच शिस्त बद्ध होता, असं म्हणता येणार नाही, पण इतक्या मोठ्या मालिकेतून व्यस्त कार्यक्रमातून वेळ प्रचार करणं, हे वाखाणण्या सारखं होतं. किती हि उशीर झाला तरी ते प्रचार स्थळी पोहचत असत.