Home महाराष्ट्र शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर, आता गारठा होणार कमी !

शहरांचे किमान तापमान १५ अंशांवर, आता गारठा होणार कमी !

0

प्राईम नेटवर्क : आज की ताजा गरम खबर ! अकरा अंशावर घसरलेल्या मुंबईच्या किमान तापमानात आता वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी मुंबईचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले असून, कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचले आहे. दुसरीकडे राज्यातील शहरांचे किमान तापमानही आता वाढू लागले आहे. हे ऐकून थोडी का असेना अंगातली हुडहुडी कमी आली की नाही ?

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार,मुंबईचे किमान तापमान मंगळवारी १७.८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले असून, राज्यात सर्वांत कमी किमान तापमान नागपूर येथे ११ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.

डहाणू, अहमदनगर, कोल्हापूर, महाबळेश्वर, सांगली, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, बीड, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, वाशीम, वर्धा, यवतमाळ या शहरांचे किमान तापमान १५ अंशावर पोहोचले आहे. बुधवारसह गुरुवारी मुंबईचे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३७, २२ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

आज मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता दर्शवली आहे. विदर्भात काही ठिकाणी पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपीट. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल. आता हवामान खात्याचा अंदाज कितपत खरा ठरतो ते बघूयाच पण हे नक्की की आता पाण्याचे माठ,पंखे माळावरून काढायची गरज भासेल.