राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सभागृहात समृद्धी महामार्गाची जमीन हस्तगत प्रक्रियेपूर्वी चौकशी करण्यात यावी अशी मागणी घातली आहे. सदर महामार्गाला आवश्यक जमीन अधिसूचना लागेपर्यंत चौकशीत ठेवावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या मार्गावरच्या जमिनी अधिकारी लोकांनी आधीच विकत घेऊन सरकारकडून त्याबदल्यात ४ पट जास्ती पैसे उकळले. हे आरोप फार गंभीर असून त्यावर चौकशी होणे फार महत्वाचे आहे. पण सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे सांगितले. दरम्यान सभागृहातील गोंधळामुळे हा प्रश्न दबून राहिला पण चव्हाण म्हणाले की ते हा मुद्दा लावून धरणार आहेत.
नागपूर- मुंबई हा कोट्यवधी रुपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प ७०० किलोमीटर लांब असून ४९,००० करोड रुपये असा अंदाजित खर्च त्याचा आहे. हा मार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, औरंगाबाद, नाशिक, भिवंडी, ठाणे या मार्गाने जाणार आहे.