सध्या आर्थिक मंदी आणि महागाईने देशाला झोडून काढलं आहे. लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार, रिझर्व्ह बँकेच्या मते महागाईचा दर सरासरी चार टक्क्यांच्या जवळपास राहील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात पाहता पाहता हा दर ७.३५ टक्क्यांवर जाऊन ठेपला आहे. अर्थात निश्चितच अंदाजाच्या दुप्पट महागाई झाली. ‘महागाईची अनेक कारणं असतील मात्र विद्यमान केंद्र सरकारच्या धोरणांचे काय?’ असा सवाल शिवसेनेने उभा केला आहे. त्याचबरोबर ‘देशाची अर्थव्यवस्था व महागाईला हीच केंद्राची धोरणे जबाबदार आहेत,’ अशा शब्दांत शिवसेनेने मोदी सरकारवर तोफ डागली.
काँगेस सरकारला भाजपने महागाईच्या मुद्यावरून अनेक टीका व आरोप केले होते. 2014 पासून आजतागायत भाजप सत्तेत आहे तरी देखील आर्थिक विकासाची घसरण व महागाई थांबत नाही तर उलट वाढत आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस भाजीपाला, अन्नधान्य, सोने, चांदी, तेल प्रत्येक गोष्टीचे भाव सातत्याने वाढत आहेत. परिणामी एकीकडे सर्वसामान्य माणूस महागाईने झोडला जातोय तर तरुणांना नोकऱ्या नाहीत. आहे त्या तरुणांच्या नोकऱ्यावरही गदा येत आहे. अशात जनतेने जगावं तरी कसं? ‘अच्छे दिन’ येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे ‘बरे दिन तरी आणा’ असा टोला शिवसेनेने दिला आहे.