राज्यभरात निवडणुकीची जोरदार तयारी चालू आहे. सोबतच प्रचाराचा रणसंग्राम चालू झाला आहे. अशात काही उमेदवारांचे प्रचार फंडे तर काहींची आश्वासने चर्चेचा विषय ठरत आहेत. चंद्रपूरच्या चिमूर मतदारसंघातील असाच एक प्रकार नुकताच खूप प्रसिद्धीस येत आहे. अखिल भारतीय मानवता पक्षाच्या वनिता जितेंद्र राऊत या अपक्ष उमेदवाराने प्रचारासाठी एक अजब गजब शक्कल लढवली आहे. एकीकडे सबंध जिल्ह्यात दारुबंदी आहे, त्यात दुसरीकडे या उमेदवार जिल्ह्यात दारुला उघड समर्थन देत ‘गाव तिथे बार’ असे आश्वासन देत प्रचार करीत आहेत. तसे त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात देखील नमूद केले आहे.
वनिता जितेंद्र राऊत यांनी केलेला हा प्रचार केवळ चंद्रपूर पुरताच नाही तर राज्यभरात व्हायरल होत आहे व लोक याचा यथेच्छ हशा उडवत आहेत. बेरोजगार तरुणांना दारु विक्रीचे परवाने, गाव तिथं बिअर बार, दारिद्र्य रेषेखालील लोकांना सवलतीत दारु, हे सर्व ऐकून साहजिक कुणालाही नवल वाटल्या शिवाय राहणार नाही. त्यांचा जाहीरनामा सोशल मीडियावर वनव्यासारखा पसरत आहे.
मात्र गमतीचा भाग बाजूला ठेवला तर चंद्रपूर मध्ये दारूबंदी असतांना बंदी उठवण्याचे आश्वासन देणाऱ्या या वनिता राऊत विशेष आकर्षणाचा विषय ठरल्या आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या पत्रात चंद्रपुरात झालेली दारूबंदी केवळ नावाची असल्याचे नमूद केले आहे व एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्या चंद्रपूरच्या नागरिकांना रेशन कार्डामार्फत धान्यासोबत स्वस्त भावात दारू देणार आहेत. अखिल भारतीय मानवता पक्ष हे नाव तुम्ही कधी ऐकले नसेल मात्र हा त्यांचे पती अर्थात जितेंद्र राऊत यांनी स्थापन केलेला पक्ष आहे. हे तेच जितेंद्र राऊत आहेत जे कायम सोशल मीडियावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत असतात.