‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकाच्या वादावर आणि सोशल मीडियावर होत असणाऱ्या टिकांवर पूर्णविराम देण्यासाठी प्रकाश जावडेकर यांनी आपल्या अधिकृत खात्यावरून मोठा खुलासा केला आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले, “नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचा BJP शी काहीही एक संबंध नाही. त्याच बरोबर भाजपच्या कार्यक्रमाचाही तो भाग नव्हता.” असं म्हणत त्यांनी सांगितले की, “आता लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले असून हा वाद आता संपला आहे.”
जावडेकरांच्या या ट्विटमुळे नेटकरी व संतप्त शिवप्रेमी सुखावले आहेत. ABP माझाच्या रिपोर्टनुसार या पुस्तकाचे लेखक व भाजप नेते जयभगवान गोयल आपल्या मतावर ठाम होते. मात्र जावडेकरांच्या ट्विट नुसार आता त्यांनी माफी मागितली आहे. सदर पुस्तकाच्या मथळ्यात नरेंद्र मोदी व छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केल्याने या वादाला सुरुवात झाली होती.