महाराष्ट्रातील दिव्यांग शाळांचे शिष्टमंडळ मंत्रालयात दिव्यांग शाळांसाठी अनुदानाची मागणी करायला गेले असता सदर मंत्र्यांची भेट न झाल्याने दोन शिक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. असे प्रकार कायम घडत असल्यामुळे मंत्रालयात सुरक्षा जाळी लावण्यात आली आहे. या जाळीमुळे दोन्ही शिक्षकांचा जीव वाचला असून पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेतले आहे.
राज्यातील ३०० विनाअनुदानित दिव्यांग शाळांसाठी अनुदानाच्या मागणीसाठी काही प्रतिनिधी शिक्षक आज दिनांक १८ सप्टेंबरला सायंकाळी मंत्रालयात गेले होते. परंतु मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याची टाळाटाळ केली. आपल्या मागण्या सरकार पूर्ण करत नसून त्यावर चर्चा करणेही टाळत असल्याने हेमंत पाटील आणि अरुण नेतोरे या दोन शिक्षकांनी निषेधाच्या घोषणा करत मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उड्या टाकल्या. परंतु अशाच घटनांची पूर्वकाळजी म्हणून मंत्रालयात लावण्यात आलेल्या सुरक्षा जाळीत ते दोघे अडकले. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांना जाळीतून बाहेर काढून आपल्या ताब्यात घेतले.