गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये चालू असलेल्या मेगाभरती मध्ये अजून एका मोठ्या नेत्याचा सहभाग झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्वाचे नेते उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये व जनतेमध्ये यावर बरीच चर्चा रंगली होती.
काही दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यापासून ते भाजपात प्रवेश करणार हि बातमी वणव्याप्रमाणे पसरली होती. काल रात्री त्यांनी राष्ट्रवादी पक्षाध्यक्ष शरद पवार, आमदार शशिकांत शिंदे व विधानसभा विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांची भेट घेतल्याची बातमी समोर आली. त्यानंतर ते राष्ट्रवादीतच राहणार की भाजपात प्रवेश करणार अशा चर्चेला पुन्हा उधाण आलं. पण आज सायंकाळी त्यांचा भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. शनिवारी दिल्लीला जाऊन ते खासदारकीचा राजीनामा देणार व रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदयनराजे आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करतील अशी माहिती मिळाली आहे.