राज्यामधील कोरनाबाधितांची संख्या दिवसोंदिवस वाढत असतानाच विरोधी पक्ष म्हणजेच भाजपाने राज्य सरकारच्या कारभाराविरोधात आंदोलन सुरु केलं आहे. राज्यातील करोनाच्या वाढत्या आकड्यांसाठी राज्य सरकारचे ढिसाळ नियोजन कारणीबूत असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला. तर दुसरीकडे राज्य सरकार करोनासंबंधित कामं नियोजनानुसारच केली जात असल्याचं सांगताना दिसत आहेत. असं असतानाच राज्य सरकारला दिलासा देणारी एक आकडेवारी समोर आली आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आणि राष्ट्रीय नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठी आयएएनएस आणि सी व्होटर्स या संस्थेने संयुक्तरित्या केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता ७६.५२ टक्के असल्याचे म्हटले आहे.
सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओदिशाचे नवीन पटनायक पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता जवळपास ८३ टक्के इतके आहेत. त्यांच्यानंतर छत्तीसगडचे भूपेश बघेल (८१ टक्के), केरळचे पिनरायी विजयन (८० टक्के), आंध्र प्रदेशचे जगनमोहन रेड्डी (७८ टक्के) यांचा क्रमांक लागतो. या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी (७६ टक्के) आहेत. ठाकरे यांच्यानंतर अरविंद केजरीवाल यांचा क्रमांक लागतो. त्यांची लोकप्रियता ७४ टक्के इतकी आहे. विशेष म्हणजे या यादीतील पहिल्या सहा नावांमध्ये एकही मुख्यमंत्री भाजपाचा नाही.
अतिशय कमी लोकप्रियता असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत हरयाणाचे मनोहर लाल खट्टर पहिल्या स्थानी आहेत. त्यांची लोकप्रियता केवळ ४.४७ टक्के आहे. त्यानंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत (१७.७२ टक्के), पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग (२७.५१ टक्के), बिहारचे नितीश कुमार (३०.८४ टक्के), तमिळनाडूचे पलानीस्वामी (४१.२८ टक्के) यांचा क्रमांक लागतो.