Home महाराष्ट्र इच्छुक उमेदवाराला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ सिनेमाची स्टाईल पडली महागात: अर्ज न...

इच्छुक उमेदवाराला ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ सिनेमाची स्टाईल पडली महागात: अर्ज न भरता उलट दंड भरून परतला

0

सध्या सर्वांना विधानसभा निवडणुकीचे चांगलेच वेध लागले असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची वरचढ सुरू झाली आहे. अशात चर्चेत येण्यासाठी बरेच उमेदवार नवनवीन शक्कल लढवत असतात. नेवासा येथे तर ‘गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा’ या मराठी चित्रपटातील एका गमतीशीर सीनचं अनुकरण करत मच्छिंद्र मुंगसे या इच्छुक उमेदवाराने रक्कम भरण्यासाठी तब्बल दहा हजार रुपयांची चिल्लर आणली. त्यांच्या मते हजारो रुपयांची चिल्लर मोजता-मोजता निवडणूक अधिकाऱ्यांचे नाकीनऊ येणार व आपली मात्र गावभर चर्चा होणार.

मात्र असं काहीही घडलं नाही. उलट मुंगसे यांनी अनामतसाठी चिल्लर प्लास्टिकच्या पिशवीतून आणल्याचे निवडणूक अधिकारी शाहूराव मोरे व सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी समीर शेख यांच्या निदर्शनास आले. राज्यात प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली असता प्लास्टिक पिशवी वापरल्यामुळे मुंगसे यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा नेवासा नगरपंचायतचे मुख्याधिकारी समीर शेख यांनी पाच हजारांचा दंड सुनावला. विशेष म्हणजे हा दंड भरतांना कायदेशीर केवळ एक हजार रुपयांची चिल्लर मुंगसे यांच्याकडून स्वीकारण्यात आली. उर्वरित चार हजार रुपयांच्या मात्र नोटा घेण्यात आल्या. नियमाप्रमाणे चिल्लर स्वीकारण्यास मर्यादा असल्यामुळे केवळ एक हजार रुपयांची चिल्लर स्वीकारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

मीडिया न्यूज नुसार अनामतसाठी चिल्लर घेऊन निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे येणे मुंगसे या इच्छुक उमेदवाराला महागात पडले असून त्याला उमेदवारी अर्ज न भरताच परतावे लागले. अर्थात त्यांना स्वतःचीच स्टाईल स्वतःलाच महागात पडली.