“महायुती सरकारच्या काळात हजारो कोटींचे घोटाळे झाले होते” असा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. दरम्यान “यांची चौकशी करून व सर्व घोटाळे बाहेर काढू” असा इशारा देखील देण्यात आला होता. यावर माजी मुख्यमंत्री व विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक उत्तर दिलं आहे. “आम्ही एका पैशाचा घोटाळा केला नाही. कितीही आरोप केले, तरी आम्ही अशा धमक्यांना घाबरणार नाही.” असं म्हणत त्यांनी कुठल्याही चौकशीला सामोर जाण्याची तयारी असल्याचे सांगितले.
लोकसत्ताच्या एका रिपोर्ट नुसार, अकलूज येथे सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये फडणवीस म्हणाले, “महायुती सरकारच्या काळात राज्यात कारभार चालवितांना आम्ही एका पैशाचा देखील घोटाळा केलेला नाही. आमचा कारभार अतिशय पारदर्शक असून केवळ मलाच नाही तर राज्यातील सामान्य जनतेला देखील आमचा कारभार पारदर्शक असल्याचे ठाऊक आहे.” त्यानंतर “आमच्यावर कोणीही कितीही आरोप केले किंवा धमकावले तरी आम्ही अशा धमक्यांना वा इशाऱ्यांना घाबरणार नाही. कुठल्याही चौकशीला सामोरे जायची आमची तयारी आहे” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब थोरात यांना उत्तर दिले आहे.