Home आरोग्य “कोरोना सोबत आपलं युद्ध सुरू आहे. कृपा करून घाबरून जाऊ नका, घाबरल्याने...

“कोरोना सोबत आपलं युद्ध सुरू आहे. कृपा करून घाबरून जाऊ नका, घाबरल्याने युद्ध जिंकता येत नाहीत”: उद्धव ठाकरे

0

राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे. ‘करोना व्हायरससोबत हे युद्ध आहे. हे युद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे सगळ्यांनी जिद्दीनं लढा द्यायला हवा. घाबरून चालणार नाही. सर्वच सरकारी यंत्रणा करोनाला तोंड देण्यासाठी सज्ज आहे. यात राज्यातील जनतेनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं. सरकार प्रसंगी कठोर निर्णय घेऊ शकते. ती वेळ आणू नका, असं कळकळीचं आवाहन मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलं.

कोरोना व्हायरसच्या महाराष्ट्र राज्यातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी कोरोनाच्या संकटाची तुलना १९६५ आणि १९७१साली झालेल्या युद्धाशी केली. त्यावेळी भोंगा वाजला की लोक आपापल्या घरात जाऊन लपायचे. घरातील दिव्यांचा प्रकाशही बाहेर येऊन दिला जायचा नाही.

बस आणि ट्रेनची गर्दी जरी थोडी कमी झाली असली तरी अजूनही काही जणांकडून अनावश्यक प्रवास होत आहे. कोरोना विषाणू एक-एक पाऊल पुढे टाकत आहे. त्यामुळे आत्ताच सावध होणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दी टाळण्यासाठी कायदा करण्याची गरज येऊ नये. मात्र, या सगळ्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाचा सामना करण्यासाठी आपण पूर्णपणे सज्ज आहोत. शेवटी युद्ध ही जिद्दीवरच जिंकली जातात, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.