Home महाराष्ट्र हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत, पण.. : चंद्रकांत पाटील

हिंदुत्वाच्या भूमिकेचे स्वागत, पण.. : चंद्रकांत पाटील

0

काल मनसेचे पहिले महाधिवेशन पार पडले, ज्यात पक्ष आता हिंदुत्वाच्या मार्गानेच वाटचाल करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी ‘माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ आशी नेहमीप्रमाणे हाक न देता ‘माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो’ अशी साद दिली. कालच्याच दिवशी मनसेचा बहुरंगी झेंडा बदलून छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण करण्यात आले. मनसेच्या या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे मनसे व भाजप पक्षांची युती होऊ शकते असे अंदाज वर्तवले जात आहेत. भाजपाचे नेते चंद्रकांत पाटील यांनी तर मनसेचे स्वागत असल्याचे म्हटले आहे.

लोकमतच्या एका रिपोर्ट नुसार चंद्रकांत पाटील म्हणतात की, “महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाने हिंदुत्वाची भूमिका घेतली याचे आम्ही स्वागत करतो. पण परप्रांतीय लोकांवर अन्याय, अत्याचार केलेला भाजपाला मान्य नाही. मनसेला भाजपामध्ये यायचे असेल तर आपली भूमिका बदलायला हवी. तरच भाजपा मनसे एकत्र येऊ शकतील” असं त्यांनी मत व्यक्त केलं. मनसेचे बरेच कार्यकर्ते, नेतेमंडळी मुंबईतील टॅक्सी चालक व परप्रांतीयांना दमदाटी करतात, वेळ प्रसंगी हातही उचलतात. याचे कायम ते व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करीत असतात. मनसेच्या याच भूमिकेवर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला.