काँग्रेस आणि समाजवादी पार्टीबरोबरच शिवसेनेने सुद्धा आता रॅपीड टेस्ट कीटवरून भाजपसमोर सवाल उपस्थित केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखामध्ये रॅपीड टेस्ट कीटवरून मोदी सरकारवर शिवसेनेने टीका केली आहे.
मोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला दिलेली आहे, त्या किट्सची पहिली खेप एकदम बिनकामाची निघाली. शेवटी चिनी माल पूर्ण भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या की, झाले ते झाले. सध्याच्या बोगस कीट्सच्या ऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्स वापरा!’ म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल पडलेला असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशासाठी आणि त्यांना लटकायचे कशाला?, अशा शब्दात रॅपीड टेस्टवरून शिवसेनेने निशाणा साधला आहे.
चीन कधी काय करेल याचा काहीएक भरवसा नाही व इतके असूनही भारतासारखे राष्ट्र चीनकडून कोरोना या विषाणूच्या रॅपिड टेस्ट कीट मोठय़ा प्रमाणात घेत आहे व एकप्रकारे चीनच्या अर्थव्यवस्थेस मजबुती देणारे काम करीत आहे. एक वेळ तेही चालले असते, पण चिनी मालाची अवस्था ही चले तो चांद तक, नहीं तो रात तक’ अशी काहीशी असते. त्यामुळेच चीनकडून खरेदी केलेले लाखो रॅपिड टेस्ट कीट भंगारात टाकून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.
धारावीसारख्या `कोरोना हॉट स्पॉट’ भागामध्ये रॅपिड टेस्टचे काम सुरू झाले, पण मुंबई महापालिका प्रशासनाने या रॅपिड टेस्ट तत्काळ थांबवायला सांगितल्या. कारण चिनी माल हा नेहमीप्रमाणे भंगार निघाला व कोरोनाचा बाजार करून चीनने भारताच्या गळय़ात टाकावू माल मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून रॅपिड टेस्ट कीटबाबत तक्रारी येऊ लागल्या. हा सर्व गोंधळ कोरोनाबाबतची चिंता वाढवणारा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.