प्राईम नेटवर्क : शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं मुंबईच्या ‘सक्तवसुली संचलनालय’ म्हणजेच ईडी कार्यालायात जबरदस्तीने जाण्याचं महानाट्य शुक्रवारी मुबंईत दिवसभर रंगले होते. यावेळी दुपारी दोनच्या सुमारास पवार ईडी कार्यालयात जाणार असल्याचं घोषित करण्यात आलं, मी येतोय, असं म्हणत पवार आणि राष्ट्रवादी कडून पोस्टर बाजी करण्यात आली. यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुबंईत एकच गर्दी केली होती, यावर ईडीने सध्या शरद पवारांची चौकशीची गरज नसल्याचं सांगितलं, ज्यावेळी गरज असेल, त्यावेळी बोलावू, असं ईडी कडून सांगण्यात आलं, पण पवारांसह, राष्ट्रवादीचे नेते, कार्यकर्ते जोशात असल्याने राष्ट्रवादीचा शुक्रवारी मुबंईत हायव्होल्टेज ड्रामा रंगला. या नंतर शरद पवारांना उपरती झाली आणि त्यांनी आपण ईडी कार्यालयात जाणार नसल्याचं जाहीर केलं.
शरद पवारांनी ईडी आणि भाजपला कसं डॉमिनेट केलं यावर चर्चा रंगू लागली, यावर राष्ट्रवादीने कहर केला आणि शरद पवार यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवतारात दाखवलेलं पोस्टर म्हणजेच व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केलं, विशेष म्हणजे अमित शाह यांना “शाहस्तेखान” म्हणत त्यांची बोटे कापताना शरद पवारांना दाखवण्यात आलं, आणि भाजपने यावर निषेध नोंदवला, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नखांची तरी सर आहे का शरद पवारांना ?” असं म्हणत शरद पवारांसह राष्ट्रवादीचा निषेध केला.
शरद पवारांची तुलना थेट छत्रपति शिवाजी महाराजांशी केल्याने महाराष्ट्रात संताप व्यक्त होऊ शकतो, आणि राष्ट्रवादीला अधिक नुकसान होऊ शकतं, हे समजल्यावर राष्ट्रवादीने हे वादग्रस्त व्यंगचित्र सोशल मीडियावरून हटवलं. मात्र याची जी चर्चा व्हायची तो मात्र झालीच. महाराष्ट्र भाजपने ट्विट करत म्हटलं कि ‘स्वतःला महाराजांच्या जागी दाखवून शिवरायांची प्रतिमा मलिन करून जनभावना दुखावल्या बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांचा तीव्र निषेध या निवडणुकीत जनता मत पेटीतून त्यांचा कोथळा काढल्या शिवाय राहणार नाही.
राजकारणाची घसरलेली पातळी पाहता शरद पवारांची तुलना चक्क छत्रपती शिवाजी महाराजांशी करणं कितपत योग्य आहे ? अभिनयातून छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे, आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचा राजा देवेंद्र असं म्हटल्यावर त्यावर उद्विग्नपणे महाराष्ट्राचा राजा फक्त एकच असं म्हणणारे अभिनेते अमोल कोल्हे यांनी ज्या प्रमाणे गड किल्ल्यां संदर्भात आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली होती, त्या प्रमाणे ते शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवादी कडून होणाऱ्या अपपमानावर देखील आपली भूमिका स्पष्ट करतील का ? कि अभिनेता अमोल कोल्हेंच शिवरायां वरचं प्रेम हा फक्त दिखाऊपणा आहे ? हे लवकरच समजू शकेल.