प्राईम मीडिया : भाजप शिवसेनेच्या सत्ता संघर्षात सध्या महाराष्ट्रातील सर्व राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. भाजपने सत्ता स्थापनेस असमर्थता दर्शवल्यावर भाजप नंतर शिवसेनेकडे ही संधी चालून आलीये, परंतु आत्ता पर्यंत शिवसेनेने भाजपला ब्लॅकमेल केल्यानंतर, भाजपने शेवटी गुडघे टेकवले, आणि आता बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, या म्हणी प्रमाणे शिवसेनेला एक तर बहुमत सिद्ध करावं लागेल, किंवा चुकलं- माकलं पदरात घ्या म्हणत, थोरल्या जाऊ बाईंसोबत संसार थाटावा लागेल. नाही तर पुन्हा महाराष्ट्राला निवडणुकीत ढकलावं लागेल. शिवसेनेने जर महाराष्ट्राला निवडणुकीत ढकललं तर शिवसेना राजकीय बळी ठरेल. महाराष्ट्रावर निवडणूक लादली, असं म्हणून शिवसेनेचं जनमत कमी होईल, यामुळे शिवसेना शक्यतो महाराष्ट्राला निवडणुकीच्या खाईत ढकलणारी नाही.
मग यानंतर पर्याय उरतो, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बरोबर घेऊन सत्ता स्थापन करण्याचा. जरी आपण मानलं की सत्तेसाठी सर्व गोड म्हणत शिवसेनेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आता मित्र बनतील सुद्धा, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विचारांचं काय होईल? शिवसेना ही कट्टर हिंदुत्ववादी संघटना आहे अशी देशभरात शिवसेनेची ओळख आहे. आणि अशा वेळी, राष्ट्रवादी किंवा काँग्रेसने त्यांना पाठिंबा देणं म्हणजे तथाकथित सेक्युलर छबीला तो धोका निर्माण होऊ शकेल. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला याची उत्तरे देत फिरावं लागेल. ज्याप्रमाणे २०१४ मध्ये राष्ट्रवादीने अल्पमतात असलेल्या भाजपला बाहेरून पाठिंबा दिला होता. त्यावेळी राष्ट्रवादीवर जोरदार टीका झाली, आणि राष्ट्रवादीला तो निर्णय बदलावा लागला होता. त्याचप्रमाणे यावेळी इथे फक्त राष्ट्रवादीच नाही तर काँग्रेसला सुद्धा जाब विचारला जाईल. सत्तेसाठी डबल ढोलकी म्हणत शिवसेनेवर जबरी टीका होऊ शकते.
यामुळे याच राजकीय पटलावर पुन्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला परिणाम भोगावे लागू शकतात, यामुळे हा पर्याय तितकासा सहज सोपा वाटत नाही. मग पुढील शेवटचा पर्याय उरतो, थोरल्या जाऊ बाईंसोबत सासरी जाऊन संसार थाटण्याचा. मात्र या पर्यायात ते कितपत माघार घेतील हे सांगणं अवघड आहे. कारण हे सर्व पर्याय संपल्यावर भाजप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेणं अवघड आहे. कारण भाजपकडे बहुमत नसलं तरी १०५ आमदारांचं संख्याबळ आहे, तर शिवसेनेकडे अवघे ५६ आमदारांचं बळ. यामुळे सध्या शिवसेनेचा आवाज जरी मोठा असला तरी ती फक्त डरकाळीच ऐकायला मिळू शकते. त्यामुळे जाऊबाई जोरात असं पुन्हा म्हणण्याची वेळ शिवसेनेवर येऊ शकते.