Home आध्यात्मिक माऊलींची वारी ST मधून निघाली पंढरीला

माऊलींची वारी ST मधून निघाली पंढरीला

0

कोरोना संकटामुळे माऊलींची यावर्षीची पंढरीची वारी होते की नाही या चिंतेत सर्व वारकरी गण असताना आज माऊलींच्या पादुका ह्या लालपरीतून विठ्ठल दर्शनाला निघाल्या आहेत. “बोला पुंडलिक गुरुदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय” अशा जयघोषात माऊलींची वारी फुलांनी सजविलेल्या बसने पंढरीला रवाना झाली. आळंदीतून निघालेला वारीसोहळा विनाथांबा पुणे, सासवड, जेजुरी, लोणंद, फलटणमार्गे सायंकाळी सहाच्या दरम्यान वाखरीत दाखल झाली.

पंढरपूरला जाण्यासाठी माऊलींच्या पादुकांसोबत स्वतंत्र पोलिस बंदोबस्त असणार आहे. एसटी बसने पादुका नेताना बसमध्ये जास्तीत जास्त वीस व्यक्तींना पादुकांसोबत नेण्याची परवानगी दिली आहे. पालखी सोहळा प्रमुख योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त अॅड. विकास ढगे, पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, उर्जितसिंह शितोळ सरकार, बाळासाहेब चोपदार, रथापुढील दिंडी क्रमांक १ मधील ऋषिकेश वासकर, संभाजी बराटे, ज्ञानेश्वर दिघे, संजय कोलन, दिंडी क्रमांक दोनमधील अविनाश भोगाडे, दिडी क्रमांक तीनमधील ऋषिकेश मोरे, रथामागे दिंडी क्रमांक एकमधील चंद्रकांत तांबेकर खडकतकर, दिंडी क्रमांक दोनचे श्रीकांत टेंभूकर, दिंडी क्रमांक तीनचे भानुदास टेंभूकर, दोन आळंदीकर मानकरी, एक पुजारी, एक कर्णेकरी, एक शिपाई अशी वीस लोकांनासोबत माऊलींचा सोहळा शिवशाही एसटीने निघाला आहे.

वाखरीत गेल्यानंतर क्रमवारीनुसार संतांच्या पादुका पंढरीत प्रवेश करतील.
पोर्णिमेपर्यंत सोहळा राहिल यासाठी सरकारला विनंती केली असल्याचे ढगे यांनी सांगितले. माऊलींच्या पादुका पंढरीत पोचवून पुन्हा माघारी आळंदीला आणण्याची जबाबदारी प्रांताधिकारी संजय तेली यांच्यावर सोपवली आहे.
आळंदी माऊलींचे समाधी मंदिराचे सर्व दरवाजे बंद राहतील. देवूळवाडा, आजोळघर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त राहिल. देवूळवाडा आणि आजोळघराकडे येण्यास बंदी राहिल. तर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बॅरेकेट लावून बंद केले जाणार आहे.