“राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास १०० बस धुळे आगारातून जातील. पुढील दोन दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी होईल,” अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.सोमवारी (27 एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेतल्याचं परब यांनी सांगितलं.
लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील दीड ते दोन हजार विद्यार्थी राजस्थानच्या कोटामध्ये अडकले आहेत. महाराष्ट्र सरकारने आम्हाला परत आणण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी ते सातत्याने करत होते. याबाबत महाराष्ट्र आणि राज्यस्थान सरकारमध्ये याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे आणि त्यातून विद्यार्थ्यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. परंतु या विद्यार्थ्यांना कसं परत आणायचं असा प्रश्न होता. त्यावेळी महाराष्ट्राची लालपरी मदतीला धावून आली.
“महाराष्ट्रातील जी मुलं कोटा इथे अडकली होती त्यांना परत आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. त्याबाबत महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या जवळपास १०० बस धुळ्यातून कोटो इथे जातील आणि त्या मुलांना पुन्हा महाराष्ट्रात घेऊन येतील. त्यानंतर त्यांना आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था केली जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाची अंमलबजावणी पुढील दोन दिवसात होईल,” असं अनिल परब म्हणाले.
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेच्या तयारीसाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी राजस्थानमधील कोटा इथे जातात. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असतो. यावर्षी कोटामध्ये शिकायला गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. पहिला लॉकडाऊन १४ एप्रिलला संपणार होता. त्यावेळीस या विद्यार्थ्यांना १४ एप्रिलपर्यंत इथेच राहा, मग पुढे पाहू, असं तिथल्या शिक्षणसंस्थांनी सांगितलं होतं. यानुसार हे विद्यार्थी तिथेच थांबले. मात्र येत्या 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवल्याने अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात परत येण्यासाठी विनंती केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीचा राज्य सरकारने सकारात्मक विचार करत त्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. यासाठी लवकरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कोट्याला रवाना होणार असून तिथे अडकलेल्या सर्व विद्यार्थ्याना महाराष्ट्रात लवकरच आणलं जाईल.