देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यातच कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमध्ये आता काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे. तामिळनाडू राज्यात आजपासून सलून आणि ब्युटी पार्लर उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, केस कापण्यासाठी आधारकार्ड हे अत्यावश्यक केले आहे. तामिळनाडू सरकारने सलूनसाठी एसओपी जारी केले आहे.
तामिळनाडू सरकारने जारी केलेल्या एसओपीनुसार, जर तुम्हाला जर केस कापून घ्यायचे असतील वा सलून मध्ये जायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड दाखवावे लागेल. सलून मालक प्रत्येक ग्राहकाचे नाव, पत्ता, फोन नंबर आणि आधार कार्ड नंबरची नोंद करेल. जर एखाद्या ग्राहकाने आधार कार्ड दाखविले नाही, तर त्याच्याविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
याचबरोबर, कोणतेही सलून ५० टक्के कर्मचारी (८ पेक्षा जास्त नाही) असतील तरच उघडणार आहे. तसेच, सलूनमध्ये एसी लावण्यास परवानगी नाही. सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी मास्क लावणं बंधनकारक आहे. तसेच, ग्राहकांनी आधी हात स्वच्छ धुवावे लागतील. यानंतर त्यांना आरोग्य सेतु अॅपचा तपशील दाखवावा लागेल, असेही तामिळनाडू सरकारच्या एसओपीमध्ये म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात मागील दोन महिन्यां पेक्षा अधिक दिवसांपासून राज्यातील सलून, ब्युटी पार्लर बंद आहेत. ते सुरु करण्याची परवानगी अद्याप सरकारने दिलेली नाही. तरीही सर्व खबरदारीचा उपाय करून सलून सुरु करण्याची तयारी व्यवसायिकांनी दाखवली आहे. पण यामध्ये खबरदारी घेताना ज्या उपाययोजना करायच्या आहेत. त्यासाठी सर्व गोष्टींचा सारासार विचार करून, सलून सुरु होण्यापूर्वीच दरात 20 ते 40 टक्के दरवाढ निश्चित करण्यात आली आहे.
सलूनमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी खुर्च्या कमी करून खुर्च्यांमध्ये अंतर ठेवणे, मास्क सॅनिटायजरचा वापर करणे, पीपीई किटचा वापर करणे, अशा प्रकारचा खर्च वाढणार आहे.