Home राष्ट्रीय पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हवाई हल्ल्याचा पर्याय.

पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी हवाई हल्ल्याचा पर्याय.

0

प्राईम नेटवर्क : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सैन्यदलाने नियंत्रण रेषेवर पाकिस्तानावर लष्करी दबाव वाढवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानही पूर्ण अलर्टवर आहे. पुलवामा हल्ल्यात भारताने आपले वीर गमावाल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची भावना आहे. काहीही करुन पाकिस्तानला धडा शिकवाच असाच सर्वत्र सूर आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला वठणीवर आणण्यासाठी नेमकी काय कारवाई करावी यावर सरकार दरबारी विविध पर्यायांवर विचार सुरु आहे.

युद्धापेक्षा पाकिस्तानात घुसून मर्यादीत स्वरुपाची पण पाकिस्तानला अद्दल घडेल अशी ठोस कारवाई करावी असे संरक्षण तज्ञांचे मत आहे. सुखोई-३०एमकेआय, मिराज-२००० आणि जॅग्वार या फायटर विमानांद्वारे स्मार्ट बॉम्ब, मिसाइलने शत्रू प्रदेशातील दहशतवादी तळ, लाँच पॅड उडवता येऊ शकतात. पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश न करताही हा हल्ला करता येईल. या प्रकारच्या कारवाईसाठी वेळही खूप कमी लागेल असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ल्यांचा एक पर्याय आहे. नियोजनबद्ध पद्धतीने केलेले एअर स्ट्राईक उपयुक्त आणि परिमाणकारक ठरतील असे काही लष्करी अधिकाऱ्यांचे मत आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये आता समोरच्याला धक्का देण्याचे नाविन्य राहिलेले नाही तसेच पाकिस्तानही पूर्ण अलर्टवर आहे असे संरक्षण तज्ञांचे मत आहे.

२९० किमी रेंज असलेले सुपरसॉनिक ब्राह्मोस मिसाइल आणि अन्य शस्त्रास्त्राद्वारे पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या, दहशतवादी तळ उडवता येऊ शकतात असे या अधिकाऱ्याने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना याची मोठी किंमत मोजावी लागेल असे स्पष्टपणे सांगितले आहे.