लॉकडाउननंतर वेगवगेळ्या राज्यांमध्ये अडकून पडलेल्या स्थलांतरित कामगारांना स्वत:च्या राज्यामध्ये पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी अखेर रेल्वे मंत्रालयाने मान्य केली आहे. आज हैदराबादजवळील लिंगमपिल्ली येथून झारखंडमधील हटियासाठी कामगारांना घेऊन जाणारी विशेष गाडी सोडण्यात आली. २५ मार्चपासून देशामध्ये लॉकडाउन सुरु झाल्यानंतर आज पहिल्यांदाच प्रवासी वाहतुकीसाठी रेल्वेची विशेष गाडी धावली आहे. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलं आहे.
तेलंगण सरकारने केलेल्या विनंतीनंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हैदराबादमधून हटियासाठी विशेष रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे एएनआयने म्हटलं आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशनानुसार झारखंडमधील कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे म्हणून ही विशेष रेल्वे सोडण्यात आली. या रेल्वेला निरोप देण्यासाठी काही रेल्वेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी लिंगपपिल्ली स्थनकावर उपस्थित होते. महिन्याभराहून अधिक काल लॉकडाउनमध्ये घालवल्यानंतर अखेर आपल्या राज्यात परत जातानाचा आनंद कामगारांच्या चेहऱ्यावर दिसत होता. अनेकजण खिडकीमधून हात बाहेर काढून रेल्वेच्या अधिकाऱ्यांचा निरोप घेताना व्हिडिओत दिसत आहे.
तेलंगणमधून झारखंडला रेल्वे गाडी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी अशाप्रकारच्या कोणत्या गाड्या कुठे सोडल्या जाणार आहेत यासंदर्भातील निर्णय केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या आदेशानुसार घेण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितलं आहे. ज्या राज्यामधून ट्रेन सोडण्यात येणार आहे आणि ज्या राज्यात ती जाणार आहे अशा दोन्ही राज्यांच्या विनंतीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने निर्णय घेऊन दिलेल्या आदेशांप्रमाणे पुढील नियोजन केलं जाणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे
मागील अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या राज्यातील मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे राज्यात अडकून पडलेल्या कामगारांना त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी विशेष रेल्वे सोडण्याची मागणी केली होती. अखेर यासंदर्भात केंद्र सरकारने सकारात्मक निर्णय घेत कामगारांना त्यांच्या मूळ राज्यात जाण्यासाठी रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता महाराष्ट्रात विशेषतः मुंबई मध्ये अडकलेल्या परराज्यातील मजुरांसाठी सुद्धा ट्रेन सोडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे!