Home तंत्रज्ञान बँकेचे व्यवहार ऑनलाईन करतांना सतर्क रहा; एसबीआयने ग्राहकांना केले ‘या ५ चुका’...

बँकेचे व्यवहार ऑनलाईन करतांना सतर्क रहा; एसबीआयने ग्राहकांना केले ‘या ५ चुका’ टाळण्याचे आवाहन

0

सर्वकाही ऑनलाईन होत असतांना दिवसेंदिवस बँकेचे व्यवहार ऑनलाईन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यासोबतच ऑनलाईन व्यवहारांमधील फसवणुकीचेही प्रमाण वाढत असल्याचे समजते. या फसवणूकींपासून सुरक्षित राहण्यासाठी रिसर्व बँक कायम मार्गदर्शक तत्वे सांगत असते. त्याचप्रमाणे एसबीआयनेही आपल्या ग्राहकांना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी ५ सामान्य चुका टाळण्याचे आवाहन केले आहे. सामनाच्या मीडिया न्यूजनुसार एसबीआयची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे:

१. बँक अकाऊंटची माहिती मोबाईलमध्ये सेव्ह करू नका
बँक अकाउंट तसेच ऑनलाईन बँकिंग संबंधातील कुठलीही माहिती फोनमध्ये सेव्ह करू नये. आपल्या कार्डचा फोटो, तसेच अकाउंट नंबर सिव्हिवी या गोष्टी आपण फोनमध्ये सेव्ह करून ठेवल्या आणि फोन हॅक झाला तर या गोष्टी लीक होऊन आपल्या बँक अकाऊंटची सर्व माहिती त्यांना कळू शकते व पैसे जाऊ शकतात.

२. ओटीपी, सिव्हिव्ही, युपीआय आयडी, पिन कोणासोबत शेअर करू नका
आपल्या कार्डचा सिव्हिवी, पिन, ओटीपी कधीच कोणासोबत शेअर करू नये. अनेकदा बँकेच्या नावाने फोन करून फसवे लोक ही माहिती आपल्याकडून काढून घेऊ शकतात. अशा कुठल्याही अनोळखी व्यक्तीने ही माहिती मागितल्यास ती त्याला देऊ नये.

३. एटीएम कारची माहिती शेअर करू नका
वरील मुद्द्यात सांगितल्याप्रमाणेच एटीएम कार्डची कुठलीच माहिती कोणाबरोबर शेअर करू नका. एटीएम कार्ड दुसऱ्याला वापरण्यासाठी देऊ नये. यामुळे कार्डची माहिती लीक होऊन पैसे जाऊ शकतात.

४. पब्लिक नेटवर्कद्वारे ऑनलाईन व्यवहार करू नका
कुठलेही आर्थिक व्यवहार ऑनलाईन करतांना पब्लिक वाय-फाय चा वापर करणे टाळा. असे केल्यास आपल्या बँक अकाउंटसंबंधी खासगी माहिती लीक होऊ शकते.

५. अकाऊंटसंबंधी खासगी माहिती कोणालाही देऊ नका
एसबीआय आपल्या ग्राहकांना अकौंटसंबंधातील कधीच कुठली खासगी माहिती विचारत नाही. त्यामुळे हि माहिती विचारणारा मेसेज अथवा कॉल आल्यास सतर्क राहा व कुठल्याच मोहाला बळी न पडता आपली माहिती सुरक्षित ठेवा.