भारतात दागिन्यांच्या खरेदीसाठी आघाडीवर असलेले तनिष्क ज्वेलर्स एका जाहिरातीमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सोशल मीडियावर या जाहिरातीला आक्षेपार्ह ठरवण्यात आले. बऱ्याच लोकांनी त्यावर टीका केली. ही जाहिरात लव्ह जिहादला प्रोत्साहन देणारी आहे असे मत मांडून नेटकऱ्यांनी तनिष्कला ही जाहिरात मागे घेण्यास भाग पाडले. तसेच #boycotttanishq हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेंड करत होता.
या जाहिरातीत एक मुस्लिम कुटुंब त्यांच्या हिंदू सुनेच्या डोहाळे जेवणाचा सोहळा साजरा करते. या जाहिरातीचा उद्देश हिंदू-मुस्लिम ऐक्य दाखवणे असा असेल असेही काही लोकांनी मत मांडले. परंतु त्यापेक्षा जास्त लोकांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला. याशिवाय अभिनेत्री कंगना राणावतनेही ट्विट करून या जाहिरातीवर टीका केली. ही टीकेची झोड पाहून तनिष्क ज्वेलर्सने ती जाहिरात युट्युबवर प्रायव्हेट म्हणजे इतरांना पाहता येणार नाही अशी केली.