Home राष्ट्रीय छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा भ्याड हल्ला, १७ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षल्यांचा भ्याड हल्ला, १७ जवान शहीद

0

छत्तीसगडच्या सुकमा येथे शनिवारी ‘सुरक्षा दल’ आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक  झाली. यामध्ये आपले १७ जवान शहीद झाले असून १४ जखमी झाले आहेत. डीआरजीच्या जवानांवर झालेला हा सर्वांत मोठा भीषण असा हल्ला आहे. माहितीनुसार, सैनिकांनी मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत. जखमी सैनिकांना रायपूर इथल्या रामकृष्ण रुग्णालयात दाखल केलं आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. 

नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचारांसाठी हेलिकॉप्टरच्या मदतीनं रायपूरला नेण्यात आले आहे असे कळते.बस्तरमध्ये याआधी अनेकदा नक्षलवाद्यांनी जवानांना लक्ष्य केलं होतं. मात्र डीआरजीला (जिल्हा राखीव दल) कधीही इतक्या मोठ्या जीवितहानीला सामोरं जावं लागलं नव्हतं.हल्ल्यात शहीद झालेल्या १७ जवानांपैकी १२ जवान डीआरजीचे आहेत. स्थानिक तरुणांचा भरणा असलेल्या डीआरजीनं नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्वांत प्रभावी कारवाया केल्या आहेत. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये शनिवारी दीडच्या सुमारास चकमकीला सुरुवात झाली.

कोराजगुडाच्या चिंतागुफामध्ये सशस्त्र दल आणि पोलिसांनी नक्षलवाद्यांविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केली. डीआरजी, विशेष कृती दल आणि कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिज्योलुशन ऍक्शन) यांनी संयुक्तपणे नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली. एल्मागुंडा परिसरात नक्षलवादी लपून बसले असल्याची माहिती संयुक्त टीमला मिळाली होती.
यानंतर चिंतागुफा, बुर्कापाल आणि टिमेलवाडा भागात मोठी कारवाई सुरू झाली. संयुक्त टीम एल्मागुंडाजवळ पोहचताच नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्याला संयुक्त टीमनंदेखील अतिशय चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये पाच नक्षलवादी मारले गेले. तर तितकेच जखमीदेखील झाले. या कारवाईदरम्यान नक्षलवाद्यांनी जवानांकडील शस्त्रसाठा पळवला. यामध्ये एके-४७, इंसास, एलएमजीचा समावेश आहे. कालपासून काही जवान बेपत्ता झाले. त्यांच्या शोधासाठी १५० सुरक्षा अधिकारी रवाना झाले होते. अखेर आज १७ जवानांचे मृतदेह हाती लागण्यात यश आले आहे.