राज्यात लॉकडाऊनमुळे जवळपास अडीच महिने बंद असलेले वीज मीटर रीडिंग व वीजबिलाचे वाटप महावितरणकडून सुरु करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आल्यानंतर वीज नियामक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार महावितरणने मीटर रीडिंग व वीजबिल वाटप बंद केले. एप्रिल व मे महिन्यात मीटर रिडींग घेणे शक्य झाले नसल्याने जानेवारी ते मार्च-2020 या तीन महिन्यातील वीज वापराच्या सरासरी युनिटप्रमाणे या दोन्ही महिन्याचे बिल आकारण्यात आले. एप्रिल व मे महिन्यात लॉकडाऊन व वाढत्या तापमानामुळे प्रत्यक्षात विजेचा अधिक वापर होता. मात्र कमी वीज वापर असणाऱ्या महिन्यातील सरासरीप्रमाणे वीजबिल आकारण्यात आले. आता प्रतिबंधित भाग वगळता इतर ठिकाणी मीटर रीडिंग घेऊन प्रत्यक्ष वीज वापराप्रमाणे दोन-अडीच महिन्याचे एकत्रित बिल देण्यात येत असताना हे बिल अधिक असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
करोनाच्या संकटात वीज बिले भरण्यापासून सवलत देणाऱ्या महावितरणने आता मात्र अचानक ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज देयके पाठविण्यास सुरुवात केली आहे. अनेकांना महिन्याची देयके १० हजारांपासून २२ हजारांपर्यंतची आल्याने मोठा धक्का बसला आहे. आगोदरच आर्थिक कंबरडे मोडल्याने आता ही देयके कशी भरायची असा सवाल ग्राहकांना पडला आहे.करोनाने टाळेबंदीत अनेकांच्या हाताचे काम हिरावून घेतले तर अनेकांचे काम बंद होते. यामुळे मोठय़ा आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या चिंता टाळेबंदीनंतर महावितरण कार्यालयाने आणखीच वाढवल्या आहेत.