बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या निर्भयाच्या आरोपींच्या फाशीचा निर्णय अखेर आज पक्का झाला आहे. त्यानुसार कोर्टाने डेथ वॉरंट जारी केला असून फाशीची तारीख ३ मार्च ठरवण्यात आली आहे. चारही आरोपींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशी देण्यात येणार आहे. तसेच आरोपींच्या वकीलांनी सांगितल्यानुसार त्यांच्याकडे अजूनही कायदेशीर पर्याय उपलब्ध असणार आहेत.
लोकसत्ताच्या मीडिया रिपोर्टनुसार आरोपींचे वकील ए. पी. सिंह या विषयावर ANI शी बोलतांना म्हणाले, ” आमच्याकडे अद्यापही पर्याय बाकी आहेत. प्रसारमाध्यमांचा आणि राजकारण्यांचा दबाव असल्याने कोर्टाने डेथ वॉरंट जारी करून फाशीची तारीख दिली आहे.” तसेच निर्भयाच्या आई याबद्दल बोलतांना म्हणाल्या की, “आता ही तारीख पुढे ढकलली जाणार नाही आणि३ मार्चलाच आरोपींना फाशी देण्यात येईल अशी अपेक्षा आहे.”
दरम्यान या प्रकरणावर ३ वेळा सुनावणी झाली असून तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जरी करण्यात आला आहे. याआधी २२ जानेवारी ही फाशीची तारीख ठरली होती मात्र ती पुढे ढकलली गेली. त्यानंतर १ फेब्रुवारी ही तारीख ठरवण्यात आले होती. मात्र तेव्हाही काही कारणास्तव फाशी पुढे ढकलली गेली व अखेर आज तिसऱ्यांदा फाशीची तारीख ३ मार्च ही ठरवण्यात आले आहे. या तारखेला तरी आरोपींना फाशी देण्यात येईल अशी देशभरातून आशा व्यक्त केली जात आहे.