नवी दिल्लीच्या आनंद विहार रेल्वे स्थानकात एक विलक्षण मशीन लावण्यात आले आहे. या मशीनसमोर व्यायाम करून दाखवला की मशीन तुम्हाला अगदी फुकट तिकीट देते, म्हणजेच फिटनेस आणि बचत दोन्ही!
फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत या हटके कल्पनेला मूर्तरूप देण्यात आले आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
काय करावं लागेल मशीनसमोर?
मशिनसमोर पाय ठेवण्यासाठी दोन खुणा रंगवल्या आहेत. या खुणांवर पाय ठेऊन तुम्हाला १८० सेकंदात ३० उठाबशा काढाव्या लागतील. जर तुम्ही ३० गुण घेण्यात यशस्वी झाले तर तुम्हाला प्लॅटफॉर्म तिकीट अगदी फुकट मिळणार आहे.
भारतीय रेल्वे प्रवाशांच्या आरोग्यासाठी अनेक उपक्रम राबवते आहे. त्यांनी विविध स्टेशन्सवर हेल्थ एटीएम केंद्र सुद्धा उभारले आहेत. या केंद्रात अगदी ५० रुपयात फिटनेस संबंधी १६ चाचण्या करता येतात आणि रिपोर्ट सुध्दा तात्काळ मिळतो!