प्राईम नेटवर्क : पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून अद्यापही दहशतवादी कारवाया सुरु असल्याचं दिसत आहे. नौशेरा सेक्टरमध्ये आयईडीचा स्फोट झाला आहे. या स्फोटात एक अधिकारी शहीद झाले असून एक जवान जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्याने गुरुवारी पुलवामा जिल्ह्य़ात चढविलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 30 हून अधिक जवान शहीद झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सगळीकडे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.
नियंत्रण रेषेवर तपासणी सुरु असताना आयईडीचा स्फोट झाला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेवर आयईडी ठेवला होता. आयईडी नियंत्रण रेषेपासून 1.5 किमी अंतरावर पेरण्यात आलं होतं. तो निकामी करत असताना स्फोट होऊन मेजर पदावरील एक अधिकारी शहीद झाले असून एक जवान जखमी झाल्याचे समजले आहे.