प्राईम नेटवर्क : पाकिस्तानने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा आरोप फेटाळून लावत, सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांच्या अपयशाचे खापर आमच्या माथ्यावर फोडण्याची भारताची ही चाल आहे असे म्हटले आहे. हल्ल्यानंतर लगेच कुठलाही विचार न करता चौकशीशिवाय आरोप करू नये असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मोहोम्मद फैझल यांनी म्हटले आहे.
भारताने आत्मपरीक्षण करुन सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणातील त्रुटींबद्दल उत्तर द्यावे असेही मोहोम्मद फैझल यांनी म्हटले आहे. आदिल अहमद दारचा कबुलीचा व्हिडिओ भारताने लगेच स्वीकारला पण कुलभूषण जाधव यांचा व्हिडिओ भारत मान्य करत नाही अशी टीका मोहोम्मद फैझल यांनी केली.
पाकिस्तान या हल्ल्याचं खापर भारतीय गुप्तचर यंत्रणेवर फोडत आहे. पाकिस्तानचे माजी गृहमंत्री आणि पाकिस्तान पिपल्स पार्टीचे नेते रहमान मलिक यांनी हा हल्ला म्हणजे भारतीय गुप्तचर यंत्रणा रॉने रचलेलं षडयंत्र असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात प्रलंबित असलेल्या कुलभूषण जाधव प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी रॉने हल्ला केल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.
जैश-ए-मोहम्मदच्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाल्यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानकडून ही अधिकृत प्रतिक्रिया आली आहे. १४ फेब्रुवारीला आदिल अहमद दार या आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली गाडी सीआरपीएफ जवानांच्या बसला धडकवली. त्यानंतर लगचेच पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.