Home राष्ट्रीय भारतीयांचा ‘सायबर स्ट्राईक’; पाकच्या 200 वेबसाईट हॅक.

भारतीयांचा ‘सायबर स्ट्राईक’; पाकच्या 200 वेबसाईट हॅक.

0

प्राईम नेटवर्क : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पुलवामात भ्याड दहशतवादी हल्ला केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. भारताने पाकिस्तानला सर्वच स्तरांवर कोंडीत पकडण्यास सुरूवात केली असतानाच;आता भारतीय हॅकर्सनीही पाकवर ‘डिजिटल सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे. यामध्ये पाकमधील 200 हून अधिक वेबसाईट हॅक केल्या आहेत. विशेष म्हणजे यामध्ये पाकिस्तान सरकारच्या काही वेबसाईट्सचाही समावेश आहे.

हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४/०२/२०१९ कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच ‘पुलवाम्यातील दहशतवादी हल्ल्यात ज्या जवानांनी प्राणांची आहुती दिली, त्या वीर जवानांना आम्ही आदरांजली वाहतो. भारत हा हल्ला कधीही विसरणार नाही. तुमच्यानुसार,देशभक्ती-युद्ध-जिहाद- शिट’ असे मेसेजही हॅकर्सनी पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर दिसत आहेत.

   भारतीय हॅकर्सने पाकिस्तानवर मोठा सायबर हल्ला करताना पाकिस्तानमधील २०० वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केला आहे. हॅक झालेल्या साईट्सवर या गटाचे नाव झळकताना दिसत आहे. तसेच पेटती मेणबत्ती आणि भारतीय हवाई दलाचे लढाऊ विमान तिरंग्याच्या रंगात उडताना दिसत आहे. हॅक केलेल्या वेबसाईट्सची यादीच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करण्यात आली असून यामध्ये पाकिस्तानमधील काही सरकारी वेबसाईट्सही आहेत.

दरम्यान, शनिवारी काही हॅकर्सनी पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाची वेबसाईट हॅक केली होती. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाईटवर झालेला सायबर हल्ला भारतातून करण्यात आल्याचे म्हटले होते. अशात आता पुन्हा एकदा भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानी वेबसाईटवर सायबर स्ट्राईक करत चांगलाच दणका दिल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.